विदर्भातील नऊ जिल्ह्यांचे सोमवारी तापमान 41 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवण्यात आले. धुळे शहरामध्ये सोमवारी देखील उन्हाचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसून आला. धुळ्यामध्ये 42.2 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
परभणी : एप्रिल महिना आता अर्धा संपला असून, काही दिवस शिल्लक आहेत. त्यातच वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. काही ठिकाणी उन्ह तर काही ठिकाणी गारवा अनुभवायला मिळत आहे. राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर सोमवारी उकाड्यात प्रचंड वाढ झाली. धुळे, मालेगाव, सोलापूर, परभणी या ठिकाणी तापमानाचा पारा 40 ते 42 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवण्यात आला. तर परभणी जिल्ह्याला पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भातील नऊ जिल्ह्यांचे सोमवारी तापमान 41 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवण्यात आले. धुळे शहरामध्ये सोमवारी देखील उन्हाचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसून आला. धुळ्यामध्ये 42.2 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. या तापमान वाढीला ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम कारणीभूत ठरत आहे. तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये तापमानात सातत्याने वाढ होत आहे. यात परभणीचा प्रभाव अधिक तीव्रतेने जाणवत असल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कैलास डाखोरे यांनी दिली आहे.
दरम्यान, मराठवाडा व विदर्भात कुठेही समुद्र किनारा नाही. वृक्षतोडीमुळे मराठवाडा व विदर्भातील तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर यांत्रिकीकरणामुळे वाढणारे प्रदूषणही याला कारणीभूत ठरत आहे, असेही सांगण्यात आले आहे.
उन्हाचा कडाका अन् पाऊसही
गेल्या दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. मात्र, काही भागात तापमान हे 40 अंशांच्या वर कायम आहे. मागील आठवड्यात देखील पारा 42 ते 43 अंशांपर्यंत पोहचला होता. मात्र, ढगाळ वातावरणामुळे तापमानात घसरण झाल्याचे पाहण्यास मिळाले. यामुळे काहीसा दिलासा मिळाला होता.
पुन्हा उष्णतेची लाट
गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्यात 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान नित्याचेच झाले आहे. यंदाही काही दिवसांपूर्वी 41 ते 42 अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदवले गेले असून, तापमान स्थिरावले आहे. तर आता पुढील दोन दिवसांत जिल्ह्यात उष्णतेची लाट येऊन तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.