मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विद्यापीठांना कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून उत्पन्न वाढवणारे मॉडेल विकसित करण्याचे निर्देश दिले.
शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर सुरू झाला असून, याचा प्रभावी उपयोग करून उत्पादन वाढीसाठी कृषी विद्यापीठांनी नवे मॉडेल तयार करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या 53व्या बैठकीत बोलत होते.
या दरम्यान मुख्यमंत्री म्हणाले की, हवामान बदल, कीड व्यवस्थापन आणि पावसातील खंड अशा संकटातही तग धरणारे वाण तयार करण्यासाठी संशोधन आवश्यक आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळावे यासाठीही विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा. “मिशन कृत्रिम बुद्धिमत्ता”अंतर्गत विद्यापीठांनी AI चा वापर करून पिकांचे उत्पादन वाढवण्यावर लक्ष केंद्रित करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
या बैठकीत कृषी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, विविध आमदार, कृषी अधिकारी आणि विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते. कृषी मंत्री कोकाटे यांनी परभणी विद्यापीठाने विकसित केलेल्या पोषणमूल्य असलेल्या बाजरी व ज्वारी वाणांचा उल्लेख करून संशोधनातील प्रगती सांगितली. राज्यमंत्री जयस्वाल म्हणाले, पुढील पाच वर्षांत महाराष्ट्र शेती क्षेत्रात पथदर्शी ठरेल. कृषी संशोधन हा राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून त्याचा प्रचार-प्रसार व्हावा, असे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी सांगितले.
यावेळी नवीन 430 खाटांचे वैद्यकीय रुग्णालय व 100 विद्यार्थ्यांच्या क्षमतेच्या महाविद्यालयाच्या इमारतीचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यासाठी ₹403.98 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच 132/33 के.व्ही. सेलू उपकेंद्राचेही ई-भूमिपूजन करण्यात आले. ही परिषद 31 मेपर्यंत चालणार असून 300 ते 400 कृषी शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत. नव्या तंत्रज्ञान व वाणांची शिफारस या परिषदेत करण्यात येणार आहे.